संविधानाने प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिला आहे. बऱ्याचदा आपण आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असतो, पण कर्तव्य?
माझ्या एका मताने काय होतं? किंवा मी कुणालाही मत दिले तर काय फरक पडतो? शेवटी ते फुकटच जातं, ही एक सोयीस्कर पळवाट आहे. जो कुणी उमेदवार निवडून येतो तो केवळ ज्यांनी त्याला निवडून दिले त्याचा नसतो, तर निवडणूक संपल्यावर तो त्या क्षेत्रातील सर्व लोकांचा प्रतिनिधी असतो.
ज्या जागरूकतेने आपण मतदान करू, त्याच जागरूकतेने आपण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला भेटणे, आपल्या समस्या, सूचना मांडणे आणि जनता आणि सरकार यामधील दुरी कमी करणे हेही आपले कर्तव्य आहे.
निवडणूक म्हंटली की आपण बऱ्याचदा भावनिक होतो. आपले लोकल किंवा प्रादेशिक मुद्दे यांचा आपण पहिला विचार करतो, पण हे लोकसभेला कितपत योग्य आहे?
सध्या देशासमोरील आव्हाने किंवा प्राथमिकता काय आहेत? खालील ६ आव्हानांचा जरूर विचार करा आणि न चुकता आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवारास मतदान करा.
१. संविधान बचाव : संविधानाला खरे अभिप्रेत असल्याप्रमाणे सर्व नागरिकांना समान हक्क आणि न्यायव्यवस्था, समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण, पण ते धर्मावर आधारित नाही. भारतीय मूल्यांची जोपासना करणे. आपली कुटुंबव्यवस्था अधिक सक्षम करणे.
२. लोकशाही बचाव : आपल्याकडील बरेच पक्ष हे आदेशावर चालतात, त्या पक्षात लोकशाही नाही तर एकप्रकारे घराणेशहीच चालते. म्हणजे पक्षाचा प्रमुख किंवा अध्यक्ष हा त्या घराण्याचा उत्तराधिकारी असतो.
त्यात अंतर्गत लोकशाही शून्य. दुर्दैवाने आपला समाज अंधभक्त आहे. त्यामुळे आपण अजूनही घरणेशाहीलाच मान देतो. मग वारसाकडे कर्तृत्व असो वा नसो (पूर्वी राजेशाहीत होते तसेच).
३. सुरक्षा : देशात होणारी अवैध घुसखोरी – आज इंग्लंड, अमेरिका, युरोप ह्या देशांनाही अवैध किंवा शरणार्थी आलेल्या घुसखोरांचा अतिशय त्रास होत आहे. यामुळे देशाची डेमोग्राफी बदलते आणि देशाच्या संस्कृतीलाही धोका निर्माण होतो. याचे प्रमुख कारण त्यांच्या निष्ठा आपल्या मूळ देशाशी / धर्माशी जोडलेल्या असतात.
४. भ्रष्टाचार : आपल्या देशात पैशाची कमतरता नाही, पण भ्रष्टाचारामुळे नियोजित केलेला पैसा कागदावर किंवा भलत्याच्यच खिशात जातो. राजकीय मंडळी यात अग्रणी असली तरी आपल्या देशातील सर्वसामान्य माणूस किती प्रामाणिक आहे?
चहापाणी किंवा मेरा क्या? या सदरात अगदी जन्मापासून ते स्मशानभूमीपर्यंत आपण बऱ्याचदा टीप, बक्षिशी किंवा लाच देत-घेत असतो. तो आपल्याला भ्रष्टाचार वाटतो की नाही? सिंगापूर या देशाची झालेली प्रगती याचे प्रमुख कारण झिरो करप्शन हे आहे.
५. स्वदेशीचा अभिमान : आपण स्वतंत्र झालो, पण आपल्याला ‘स्व’चा आपल्याला किती अभिमान आहे? आजची स्थिती बघता असे वाटू लागले आहे की पुढील दहा वर्षांत मराठी भाषा ही केवळ बोलीभाषा राहील. याचं कारण आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावं, असं मराठी पालकांना वाटत नाही, कदाचित इतर प्रादेशिक भाषांची तीच अवस्था असेल?
लडाखला चिनी सैनिक घुसले की आपण एकदम जोशात येतो, चिनी वस्तूंना विरोध करतो, पण अन्यथा इम्पोर्टेड वस्तूंचे आकर्षण आपल्याला आहेच. जपान या देशाच्या झालेल्या प्रगतीचे प्रमुख कारण स्वदेशी, स्वभाषा, संस्कृती याचा जाज्वल्य अभिमान आणि पुरस्कार.
६. शास्वत विकास आणि स्थैर्य : खरं तर विकास आणि स्थैर्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण अस्थिर असू, आपापसात मतभेद असतील, निष्पक्षपणे योग्य निर्णयाची अंमलबजावणी करू शकत नसू तर विकास कासवगतीने होईल.
विकासाचा वेग अधिक हवा, मूलभूत सोयी तर सर्व नागरिकांना मिळायला हव्यातच. विकास करत असताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून एकतर्फी विकास उपयोगाचा नाही तर शास्वत विकास हवा.
– अजित वर्तक
संपर्क : ८०९७७९६०७०