आपण दिवसेंदिवस खूपच प्रगती करत आहोत. अत्याधुनिक प्रगती कडे पाहताना विशेषत: आपल्या भारत देशातील काही चालीरीती आणि नियमांचं मला खूपच कौतुक वाटतं. आता हेच बघा ना आपल्या कृषीप्रधान देशात वर्षभर साजरे होणारे सण आपल्या आहारात करावयाचे बदल कसे करावेत याचा संदेश घेऊन येत असतात.
या आधुनिक जगाने खरं तर आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपली सगळी खाण्यापिण्याची सवय बदलून निरनिराळ्या व्याधींना निमंत्रण दिलं आहे. परंतु सुदैवाने जगाने मात्र या संकल्पनेकडे खूपच समजूतदारपणे पाहिलं आणि अभ्यासही केला. सध्याच्या आधुनिक खाण्याच्या पद्धतीने आपले पोषण होण्याची शक्यता खूपच कमी होत आहे.
बरीच अन्नधान्यं आपल्या ताटातून आणि पर्यायाने शेतातूनही गायब होत असल्याचे दिसत आहे. जसे की नाचणी, वरी, बाजरी, इ. परंतु ही अन्नधान्यं पोषणतत्त्वाचे कोठार आहेत.
यांचं महत्त्व जाणून २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे जाहीर झाले आहे. संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवून समाजाच्या सर्व स्तरामध्ये तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले जातं आहेत. ही शासनाची अंत्यत महत्त्वकांशी योजना ठरेलं.
भोगीला बाजरीची भाकरी खाल्ली जाते, परंतु शहरांमध्ये ही प्रथा मागे पडताना दिसत आहे. बाजरीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व पटवून तिला पुन्हा आपल्या ताटात आणण्याचा निश्चय आपण करूया आणि आपल्या या शरीराला शाश्वतं असा ऊर्जेचा स्रोत कायम देण्याचं वचन घेऊ या.
सध्या सगळीकडे हळदीकुंकू समारंभ सुरू आहेत. यात वाण लुटण्याची प्रथा आहे. मग वाण म्हणून बाजरीच्या पिठाचे पाकिट भेट म्हणून द्या आणि आपल्या आरोग्याबाबत शुद्ध अन्न घेण्याचं वचन देऊन तर बघा.
– ललिता वाघमोडे
(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कार्यरत आहे.)
संपर्क : 9403943807