कुंडीत झाडं लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

आज आपण घरातील झाडांची निगा अतिरिक्त खर्च न करता घरातीलच ओला कचरा वापरून कशी घ्यायची हे जाणून घेऊ. आपल्याला माहीत आहे की आपली पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व सजीव व निर्जीव सृष्टी ही पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेली आहे.

या सुंदर पृथ्वीवरील माणूस, प्राणी, पक्षी, जलचर व वृक्षवल्ली या सर्वांनाच जगण्यासाठी उजेड, वारा, ऊन, पाऊस आणि माती या सर्वांची गरज असते. वृक्षवल्ली आपल्याला भाजीपाला, फळे, फुले, औषधे, ई. सर्व काही देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानव, पशु, पक्षी आणि जलचर ई. सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू पुरवतात. तसेच घराचे, सभोवतालचे आणि पृथ्वीचे सौंदर्यही वाढवतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना परसबागेची किंवा शेतीची आवड असते, पण सर्वांकडेच स्वतःची जागा किंवा शेती असेलच असे नाही. म्हणूनच बरेचजण घरातच कुंड्यांमध्ये शोभेची झाडे व फुलझाडे लावतात. बरेच जण नर्सरीतून हवे ती झाडे घेऊन तर येतात, मात्र काही दिवसातच काही झाडे कोमेजून जातात. त्यामुळे हौस तर बाजूलाच राहते, सोबत पैसेसुद्धा वाया जातात.

मग प्रश्न पडतो की नर्सरीत तर ही झाडे खूपच सुंदर दिसत होती, पण घरी आणल्यावर ती का जगत नाहीत ? याला कारणे अनेक असतात जसे नर्सरीत त्यांची निगा योग्य प्रकारे घेतली जाते, त्यांना खात, पाणी, ऊन, वारा, माती योग्य प्रमाणात दिले जातात.

वाळलेला कचरा नेहमी काढला जातो, नर्सरीत प्रशिक्षित कामगार असतात, ई. घरी जर आपण अशीच काळजी घेतली तर ही झाडे अशीच फुलतील. अतिउत्साहात बऱ्याचदा झाड लवकर वाढावे यासाठी त्याला जास्त प्रमाणात रासायनिक खाते व पाणी यांचा मारा केला जातो, पण “अति तेथे माती” या उक्तीप्रमाणे झाडे मरगळतात किंवा मरतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

home gardening in india

कुंडीत झाडं लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

नर्सरीतून प्रथम झाड आणल्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशवीतून काढून घ्यावे. ते योग्य आकाराच्या कुंडीत लावावे. कुंडी आणल्यावर तिला तळाशी एक छिद्र पाडावे व त्यावर चपटी फरशी किंवा दगडाची चीप ठेवावी म्हणजे कुंडीचे छिद्र बंद होणार नाही आणि अतिरिक्त पाणी त्यातून निघून जाईल.

नंतर कुंडीच्या तळाशी आपल्याच परिसरातील बारीक खडे माती किंवा वाळूमिश्रित माती थोड्या प्रमाणात टाकावी. त्यावर आणलेले झाड ठेवावे व त्याच्या सर्व बाजूंनी शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळलेली माती टाकावी. कुंडीच्या वरील कडेपासून साधारण दोन इंच जागा खाली राहील अशाप्रकारे माती टाकावी म्हणजे पाणी व्यवस्थितपणे टाकता येईल.

आता कुंडी खूप ऊन लागेल अशा ठिकाणी न ठेवता काही दिवस हवेशीर व उजेड येईल अशा ठिकाणी ठेवावी. कुंडीत योग्य प्रमाणात पाणी टाकावे. एकदा का झाड व्यवस्थित रुजले की मग त्याला कोवळे ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावे किंवा दाखवावे. झाड कडक ऊन्हात ठेवू नये, झाड कोमेजते.

दिवसातून साधरण दोनदा गरजेनुसार पाणी टाकावे. पाणी कमी मिळाले की झाडे सुकतात आणि जास्त पाण्यात झाडे मरतात. वाळलेली पाने, फुले, फळे व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात व झाडाचा भार हलका करावा.

रासायनिक खते न वापरता तयार शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे, हे थोडे खर्चिक आहे. हा खर्चही आपण वाचवू शकतो. आपण प्रत्येकजण दररोज घरी वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या व फळे आणतो. त्याचापण आपल्याला खत म्हणून चांगला उपयोग करता येतो.

भाज्या, फळे निवडून किंवा कापून झाल्यावर उरलेला चांगला भाग आपण बारीक-बारीक तुकडे करून कुंडीत टाकून माती थोडी खालीवर करावी. हेसुद्धा प्रमाणातच टाकावे, अतिरेक टाळावा. याने झाडे छान जोमाने वाढतातच आणि घरातील ओला कचराही काही प्रमाणात चांगल्या कामासाठी वापरला जावून कमी होतो.

आपण जाळीची झाकण असलेली परडी घेवून घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करू शकतो. सध्या बाजारात छोट्या आकाराची कंपोस्ट खत तयार करण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व अ‍ॅलोपॅथीक औषधे नेहमीच आणतो, त्यातील बरीच औषधे ऊरतात.

अशी न वापरलेली किंवा ज्यांची मुदत संपलेली आहे अशी एक्सपायर्ड झालेली औषधे आपण कचऱ्यात फेकून न देता ती कुंड्यामध्ये टाकावी व त्यांचापण खत म्हणून वापर करावा. यानेसुद्धा झाडे छान वाढतात. वरील सर्व उपाय एकदा नक्की करून पहा व आपल्या घरातील बाग फुलवा.

– चंद्रशेखर लक्ष्मण अढाव
संपर्क : ९८२३०६५०७२
Email – srigajanan5@gmail.com

Author

Smart Udyojak Leaderboard ad
Scroll to Top