अनेकांना तंबाखूचे व्यसन असते. त्यांना हे चिवट व्यसन तर सोडायचे असते, पण काय करावे ते समजत नाही. हा छोटासा लेख त्यांच्या आयुष्यात क्रांती करेल. त्यांना आरोग्य धनसंपदा लाभेल.
व्यसन तर सोडायचे आहे, पणं सुटत नाही कारण तलफ आड येते. तलफेची मगरमिठी सुटली की काम झाले. हा प्रकार मुख्यतः मानसिक आहे. मात्र यावर उत्तरे सोपी आहेत.
संतसाहित्यामध्ये एक उदाहरण आहे. व्यसनी माणूस संताला आपली व्यसनाधीन ता सांगतो आणि काय करू असा प्रश्न विचारतो. संत सांगतात माझ्यावर दृढविश्वास असेल तर व्यसन मला अर्पण करून नंतर सेवन कर. व्यसनी व्यक्तीने तसे केल्यावर त्याच्या लक्षात आले अरे आपण हे काय करतोय? आणि त्याचे व्यसन सुटले.
काही व्यक्ती विचार करतात की यावर एखादी गोळी किवा इंजेक्शन असते तर बरे झाले असते, पणं असे काही अजून उपलब्ध नाही. मात्र एक उपाय आहे. त्यासाठी रक्ततपासणी करायची आणि आहारात बदल करायचा. सात्विक आहार करायचा. आहारात लिंबूवर्गीय फळे उदाहरणार्थ लिंबू, संत्री, मोसंबी सेवन करावीत. आहारात मोड आलेली धान्ये न चुकता समाविष्ट करावी. हळद आणि तुळशीची पाने औषध म्हणून खावीत.
तोंड नेहमी स्वच्छ ठेवावे. व्यसनामुळे अगोदरच आरोग्य बिघडलेले असते. त्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत. दात, हिरड्या, जीभ तपासावी. तंबाखूसाठी दिलेल्या या बाबी इतर व्यसनांना लागू पडतात.
मन आनंदी ठेवा. मन देव नाही, पण मन देवाला जोडलेले असते. आपण असमर्थ असतो तेव्हा देव मदतीला येतो, असा विश्वास बाळगावा. एक व्यसन जणू काही दुसऱ्या व्यसनाला आमंत्रण देत असते. तेव्हा सावध राहणे हे चांगले. काळ बदलला आहे. व्यसने शिष्टाचार होत आहेत, हे भयावह आहे. यावर उतारा म्हणजे एखाद्या वेळी इस्पितळात जावून कॅन्सरचे रुग्ण पाहावेत.
व्यसने आपले धन, आपले आरोग्य आपल्या घरातला आनंद हिरावून घेतात. त्यापासून चार हात दूर राहणेच चांगले.
– पद्माकर देशपांडे
९३२५००६२९१