दहावी-बारावीचा निकाल लागताच विद्यार्थी व पालक विविध अभ्यासक्रमांच्या शोधात लागतात. काही विद्यार्थ्यांना माहिती असते की त्यांना काय करायचे आहे, त्यांचे ध्येय निश्चित असते. मात्र ज्यांना माहीत नाही की आपल्याला काय करायचे? काय जमेल? कोणत्या क्षेत्राचे भविष्य आहे? त्यांची मात्र पंचायत होते.
कळत-नकळत ते एखादे क्षेत्र निवडतात आणि माहिती नसलेला प्रवास सुरू करतात. जे पुढे चालून काहींसाठी उत्तम तर काहींसाठी वाईट ठरते. अभियांत्रिकीसुद्धा त्यापैकी एक शिक्षणक्षेत्र. हे क्षेत्र प्रत्येकासाठी उत्तम असेलच असे नाही. या लेखात आपण या विषयावर छोटीसी चर्चा करूया.
अभियंता म्हणजे काय?
अगदी एका वाक्यात सांगायचे झाले तर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून नवीन वस्तू, उपकरण अथवा प्रक्रिया डिझायनिंग करून उत्पादन घेऊन जीवनमान सोपे करणारी व्यक्ती म्हणजेच अभियंता. अभियंते निर्माण करणारे शिक्षण म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण.
हे क्षेत्र अफाट आहे. शंभरच्या जवळपास विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, परमाणू अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी इत्यादी प्रमुख आहेत. प्रत्येकाचा वेगळा अभ्यासक्रम आहे. त्यातील भविष्यात मिळणाऱ्या संधी, मिळणारे पगार, कामाचे ठिकाण इत्यादी वेगळे आहेत.
अनेक गोष्टींचा विचार करून आपण या क्षेत्रात यायला पाहिजे तसेच अनेक गोष्टींचा विचार करून यातील योग्य शाखा आपाल्यासाठी निवडायला पाहिजे. जेणेकरून आपल्यासाठी भविष्य सुखकर होईल.
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात कुणाला प्रवेश घेता येईल?
- जे अभ्यासात हुशार आहे अथवा भविष्यात अभ्यास करण्याची ज्यांची तयारी आहे.
- ज्यांना गणित विषय उत्तम येतो व विज्ञान व इग्रजी जमते.
- ज्यांना प्रात्यक्षिके करण्याची आवड आहे अथवा त्यांची तशी तयारी आहे.
- जे क्रियाशील आहेत, कल्पक आहेत.
- ज्यांना काही नवीन निर्माण करायचे आहे.
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात कोणी प्रवेश घेणे टाळावे ?
- फक्त उत्तम पगाराची नोकरी मिळते म्हणुन प्रवेश घेणारे.
- मित्र प्रवेश घेत आहे म्हणून प्रवेश घेणारे.
- पालकांकडे पैसे आहेत म्हणुन शिक्षण घेणारे.
- पालक/नातेवाईक यांच्या म्हणण्यानुसार प्रवेश घेणारे.
- सहज प्रवेश मिळत आहे म्हणून प्रवेश घेणारे.
- जे गणित, विज्ञान व इंग्रजी विषयात कमजोर आहेत.
- जे अभ्यासात सामान्य आहे अथवा प्रचंड अभ्यास करण्याची ज्यांची तयारी नाही.
- जे कल्पक नाहीत, प्रात्यक्षिके करण्याची ज्यांची तयारी नाही.
अभियांत्रिकी क्षेत्र खूप मोठे आहे, विपुल प्रमाणात त्यात संधी उपलब्ध आहेत. मात्र जे स्वतःसाठी सुरुवातीलाच योग्य अभ्यासक्रम निवडतात, त्यात रस घेतात, त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण करतात, संबधित इतरही काही नवनवीन शिकतात व सतत शिकत राहतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
वर दिलेले मुद्दे सामान्य अनुभवावर आधारित आहे. तुम्ही हुशार आहात, मात्र नीट अभ्यासक्रम करत नाही तर तुमची हुशारी कामी येणार नाही. मात्र तुम्ही साधारण आहात, परंतु तुम्ही परिश्रम घेत आहत तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. योग्य क्षेत्र निवडा किंवा जे निवडले ते मन लावून शिका.
– प्रा. प्रविण अंबादास सापाने
8857086610
wsoppp@gmail.com